Ad will apear here
Next
चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय
चिपळूणच्या तब्बल १५५ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले वस्तुसंग्रहालय अलीकडेच खुले केले आहे. चिपळुणातील हे संग्रहालय कोकणाच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षांतील विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजीदरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे.  त्या वस्तुसंग्रहालयाची ओळख करून देणारा हा लेख...
...............
अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी पैशांत मोजता न येणारी बौद्धिक संपत्ती लाभलेल्या चिपळूणच्या तब्बल १५५ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले ‘संग्रहालय’ २४ नोव्हेंबर २०१८ रोजी मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पर्यटक, अभ्यासक आणि जिज्ञासूंसाठी खुले केले. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान, क्रोकोडाइल टुरिझमसाठी प्रसिद्ध ‘ऑफबीट डेस्टिनेशन’ असलेल्या चिपळुणातील हे संग्रहालय कोकणाच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षांतील विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजीदरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे. 

वस्तुसंग्रहालयाचे प्रवेशद्वारवस्तुसंग्रहालयाचे वेगळेपण जुन्या रचनेच्या देखण्या प्रवेशद्वारापासूनच सुरू होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या कोपऱ्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या दगडी वस्तू आपल्याला वस्तुसंग्रहालयाच्या जगात घेऊन जातात. दरवाज्यातून आतमध्ये गेल्यावर दिसणारी आकर्षक रचना आपले लक्ष वेधून घेते. आजच्या पिढीला माहिती नसणाऱ्या अनेक वस्तू इथे पाहता येतात. भाकरी थापणारी कोकणी महिला आपल्याला ग्रामीण कोकणातील स्वयंपाकघरात घेऊन जाते. सहसा पाहायला न मिळणारे, आवर्जून बनवून घेण्यात आलेले येथील हरीक दळायचे जाते आपल्याला ‘हरीक म्हणजे काय’ या प्रश्नात टाकते. तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत कोकणी लोकांच्या जेवणात मुख्य अन्न म्हणून हरकाचा भात असे. पुढे कोकणचा ‘विकास’ आडवा आला. तांदळाची (भात) विविध बियाणी उदयास आली आणि पचायला हलका असणारा हरकाचा भात मागे पडला. पर्यायाने हरकाचे उत्पादन थांबले. हरीक हे तीळासारखे लहान धान्य असते. त्याचा भात पौष्टिक, चविष्ट असतो. हा भात साबुदाण्यासारखा फुलतो. १९५०-५५दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी ९० टक्के हरीक आणि उर्वरित शेतीत वरी, नाचणी आणि कडधान्ये-भाजीपाल्याची पिके घेत असे. या हरकाच्या अत्यंत चिवट रोपकाडीचा उपयोग घरबांधणीसाठी काढाव्या लागणाऱ्या मातीच्या मापांमध्ये होत असे! एखाद्या प्रश्नातून जिज्ञासूला अशी अत्यंत ज्ञानरंजक माहिती उपलब्ध करून देण्याची क्षमता संग्रहालयामध्ये असते. म्हणूनच कशाच्याही निमित्ताने प्रवासाला दूरदेशी कोठेही गेलो, तर तेथील संस्कृतीची प्रतीके असलेली संग्रहालये आवर्जून पाहावीत असे म्हटले जाते. 

संग्रहालयातील आकर्षक, पद्धतशीर मांडणी

संग्रहालयात शिरल्यावर डाव्या बाजूने पाहत आत गेलो, की मनाला थक्क करणाऱ्या अनेक वस्तू दिसतात. संग्रहालयाच्या सुरुवातीलाच दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मीळ पुरातन वस्तूंचा खजिना दिसतो. येथील काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला तब्बल किमान १२ लाख वर्षे (आदिम पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधू संस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण) मागे घेऊन जातात. या वस्तू पुण्यातील जागतिक कीर्तीच्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेचे (डेक्कन अभिमत विद्यापीठ) कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम (ता. चिपळूण) येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदी शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षांपूर्वीचा गणपती, कलात्मक कंदील, दुसऱ्या महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बीण, वाळूचे घड्याळ, फोनचा प्रवास दर्शविणारे जुने लाकडी टेबलावरील आणि भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटीयन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनविलेली पेटी, दक्षिण ध्रुवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक (कणकवली), सिलिका (कासार्डे-तरळा), आयर्न ओअर (फोंडा-कणकवली), क्वार्टझ् (वाटूळ-लांजा), बॉक्साइट (केळशी-दापोली), जांभा (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आदी खनिजे, होकायंत्राची दिशा बदलविणारे देवाचे गोठणे (राजापूर) येथील दगड, जुना सारीपाटाचा खेळ अशा विविध वस्तू आकर्षक रचनेत मांडण्यात आल्या आहेत. 

धोंडो केशव कर्वे, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, दत्तो वामन पोतदार, पां. स. साने अर्थात साने गुरुजी, दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, जयप्रकाश नारायण यांच्या सन १९४०दरम्यान घेतलेल्या स्वाक्षऱ्या, दोनशे वर्षांपूर्वीचे ब्रिटिशकालीन, होळकर संस्थान (इंदूर), सांगली संस्थान, श्रीमंत सरकार गायकवाड (बडोदे), जोधपूर सरकार यांचे स्टॅम्पपेपर, ग्रामर ऑफ संस्कृत हे सन १८०५चे कलकत्त्यातून प्रकाशित झालेले पुस्तक, दोन आणे किमतीची भगवद्गीता प्रत, दोनशे वर्षे जुनी हस्तलिखिते, १७६३ सालचे झाशी संस्थानचे जमा-खर्चाचे कागद, १८३४ साली पार्थिवेश्वराला (पाथर्डी-चिपळूण) दिलेल्या सनदीची मूळ प्रत, लोकमान्य टिळकांनी १३ फेब्रुवारी १९२० रोजी चिपळूणला पाठविलेल्या पत्राची प्रत, ‘मु. पो. चिपळूण बंदर’ असा उल्लेख असलेली इस्ट इंडिया कंपनीची पोस्टकार्ड आपल्याला इतिहासात घेऊन जातात. 

कोकणातील खेडेगावातील स्वयंपाकघराची प्रतिकृती

दोन हजार वर्षांपूर्वीपासून अगदी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश कालखंडापर्यंतची नाणी येथे पाहता येतात. त्यात मौर्य, सातवाहन, कुषाणकाळ, शिलाहार, रोमन, पोर्तुगीज डच, शिवकालीन, पेशवेकालीन, इंदूर संस्थान, नागपूर संस्थान, झाशी संस्थान, ग्वाल्हेर संस्थान आदींच्या पुरातन नाण्यांचा समावेश आहे. पहिल्या महायुद्धात मिळालेली सन्मानपदके, १२व्या शतकातील सोन्याचे पद्मटंक आणि शिलाहारकालीन (शतक नऊ ते अकरा) डाळीच्या एका दाण्याच्या आकाराचे सोन्याचे फनम या गोष्टी संग्रहालयाच्या खजिन्याचे मूल्य वाढवत आहेत. विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कोकणातील खेडेगावातील स्वयंपाकघर, तेथील भाकरी थापणारी महिला, चूल, चिमटा, फुकणी, तांब्या, लाकडाचा पलिता, पाटा-वरवंटा, पाणी तापवण्याचे तपेले, कंदील, लाकडाची विळी, रॉकेलचा दिवा आदि साहित्य आपल्याला ग्रामीण लोकजीवनाचा नजरा दाखवते. त्यासोबतच कोकणी वापरातील कणगी, पाणी तापवायचा बंब, हरीक दळायचे जाते, पातेली, काथवट, लाकडी मापटी, घिरट, उखळ, शंभर वर्षांपूर्वीची लाकडी पेटी, पंचपाळे, चौफुला, नारळाच्या करवंटीपासून बनविलेले जेवण वाढायचे डाव, तांब्या-पितळेचे हंडे-कळश्या यांसह कोकणी देवघरातील दोनशे वर्षे जुनी प्रभावळ, समई, फुलदाणी, आरतीचे ताट, संपुष्ट, तेल घालायचे भांडे, करा-दिवा, पंचदीप, पूजेची उपकरणे, रक्तचंदन, विष्णुमूर्ती आदि दोन-तीनशे वर्षांपूर्वीच्या वस्तू आपल्याला कोकणाची सैर घडवून आणतात. 

संग्रहालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वाचन मंदिराचे कलादालन उभे राहते आहे. आपल्या कर्तृत्वाने कोकणच्या लाल मातीचा सुगंध देशासह जगभर पोहोचविलेल्या निवडक ७५ कोकणरत्नांची तैलचित्रे या कलादालनात पाहता येतील. या सर्व कोकणरत्नांच्या कार्य-कर्तृत्वाची माहिती असलेली रंगीत पुस्तिकाही अल्प दरात उपलब्ध केली जाणार आहे. त्या माध्यमातून कोकणच्या मातीचा सुगंध सर्वांना अनुभवता येईल. 

अनेक दोलामुद्रित पुस्तके, जुन्या पोथ्या असा दुर्मीळ ग्रंथसंग्रह, ३०० वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, ६२ हजार ३४४ ग्रंथ, १४२७ दुर्मीळ ग्रंथ आणि संबंधित लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेली ३०० पुस्तके असा खजिना असलेले हे वाचनालय एक ऑगस्ट १८६४ रोजी स्थापन झाले आहे. अशा समृद्ध वाचनालयाचे हे संग्रहालय आहे. 

जुने हस्तलिखित दाखविताना वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे.लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी हे वस्तुसंग्रहालय उभारण्याचे स्वप्न पहिले होते. त्यांच्यासह वाचन मंदिराचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले आणि सर्व संचालक मंडळाची मेहनत या संग्रहालयाच्या उभारणीमागे आहे. कमी जागेतही एखाद्या राष्ट्रीय संग्रहालयासारखी मांडणी हे वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य असून, त्या कौशल्यामागे ज्येष्ठ कला मार्गदर्शक प्रकाश राजेशिर्के यांची मेहनत आहे. या वस्तुसंग्रहालय दालनाएवढ्या चार दालनांत राहतील एवढ्या जुन्या वस्तू, नाणी, हस्तलिखिते, ग्रामदेवता पालखी, दगडी वस्तू, इरले, शेतीची अवजारे अशा गोष्टी वाचनालयाला अद्याप जागेअभावी मांडता आलेल्या नाहीत. 

कोकणची सांस्कृतिक राजधानी असलेले चिपळूण हे महाराष्ट्रात वेगाने विकसित झालेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक प्रमुख शहर आहे. कोकणात-चिपळुणात येणारे इतिहासप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटक, शालेय सहली, नव्या पिढीतील तरुणांनी हे संग्रहालय आवर्जून पाहायला हवे! हे संग्रहालय-कलादालन बुधवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असते. तिकीट दर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये, तर इतरांसाठी १० रुपये इतका आहे. 

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या मातोश्री उषाताई साठे यांच्या नावाने बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते २० जानेवारी २०१९ रोजी झाले. त्यांच्या वडिलांनी लिहिलेल्या ‘आठवणींचे अमृत’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २१ जानेवारी रोजी झाले. कार्यक्रमाच्या निमित्ताने महाजन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार विनायक राऊत, खासदार हुसेन दलवाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या वस्तुसंग्रहालयाला भेट दिली.

पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी
फोन : (०२३५५) २५७५७३
मोबाइल : ९४२३८ ३१६६७. 

- धीरज वाटेकर, चिपळूण
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com

(धीरज वाटेकर हे ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’या विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून, कोकण इतिहास, पर्यटन, पर्यावरणविषयक, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १८ वर्षे कार्यरत असलेले पत्रकार आहेत.)

(या वस्तुसंग्रहालयाची सैर घडविणारा स्लाइड-शो सोबत देत आहोत. जगभरातील, देशातील आणि महाराष्ट्रातील विविध संग्रहालयांबद्दलचे विविध लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZMPBW
Similar Posts
अद्वितीय छंदवेडा संशोधक : अण्णा शिरगावकर आज शिक्षक दिन आहे. तसेच, कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक असलेले अण्णा शिरगावकर पाच सप्टेंबर २०२० रोजी ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या औचित्याने अण्णांवर विशेष लेख!
‘तांबट’ पक्ष्याचा फराळ! घराच्या आवारातल्या उंबराच्या झाडावर फळांचा आस्वाद घेणाऱ्या तांबट पक्ष्याच्या जोडीचे अचानक दर्शन झाल्यावर आलेल्या सुखद पर्यावरणीय अनुभूतीचे धीरज वाटेकर यांनी केलेले हे वर्णन...
‘बगन्यासारं’ नाटक करून तिवरेवासीयांना लाखमोलाची मदत रत्नागिरी : ‘कोकनातली लोककला कशी... बगन्यासारी...’ या नाटकातल्या तात्या गावकराच्या डायलॉगची रसिकांना पुरेपूर अनुभूती देऊन सादर झालेल्या ‘कोकणचा साज, संगमेश्वरी बाज’ या नाट्यकृतीने तिवरेवासीयांसाठी लाखभराचा मदतनिधी उभारला. शनिवारी (१३ जुलै) सायंकाळी सात ते रात्री १० या वेळेत रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर
रवींद्रनाथ टागोरांच्या नोबेलला १०७ वर्षे बंगाली साहित्य आणि संगीत आणि एकंदरीतच भारतीय कलांना नवा आकार देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या ‘गीतांजली’ या रचनेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाल्याच्या घटनेला १० डिसेंबर २०२० रोजी १०७ वर्षे पूर्ण झाली. १० डिसेंबर १९१३ रोजी त्यांना हे पारितोषिक देण्यात आले होते. नोबेल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language